वणी महाविकास आघाडीत बंडाचे निशाण

 

– परंपरागत काँग्रेस मतदारसंघाला सुरुंग 

– चौरंगी लढत कुणाच्या पथ्यावर पडणार ?

मारेगाव : दीपक डोहणे 

परंपरागत वणी मतदारसंघात काँग्रेसला सुरुंग लावत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शिवसेना (उबाठा )गटाने पदरात पाडून घेतली.येथून संजय देरकर यांना उमेदवारी मिळाल्याने दोन पक्षातील गट कमालीचा अस्वस्थ आहे.येथे काँग्रेसचे जिल्हा सरचिटनीस संजय खाडे बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केल्याने चौरंगी लढत होण्याची शक्यता बळावली आहे.

 

वणी मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजु उंबरकर हे चौथ्यांदा नशीब आजमावित आहे.व भारतीय जनता पार्टीने विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना तिसऱ्यांदा तिकीट दिली आहे.महाविकास आघाडीने संजय देरकर यांना उमेदवारी दिली आहे.देरकर यांच्या उमेदवारीने शिवसेना व काँग्रेस कमालीचा अस्वस्थ आहे. किंबहुना काँग्रेसच्या परंपरागत मतदारसंघाला छेद दिला आहे. त्यामुळे अस्वस्थता मोठ्या प्रमाणात फोफावल्याचे चित्र आहे.

 

देरकर यांच्या उमेदवारीने शिवसेनेने बाजी मारली हे जरी खरे असले तरी देरकर हे स्वपक्षासोबत मित्र पक्षातील नाराजीचे आव्हान कसे पेलणार हे येणाऱ्या दिवसात दिसणार आहे.

 

हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला यावा व संजय खाडेच्या रूपात उमेदवारी बहाल करावी असा होरा मुंबई व्हाया दिल्ली पर्यंत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी लावला मात्र त्या येथे क्लीनबोल्ड झाल्या.मात्र हा मतदारसंघ अनपेक्षितपणे उबाठा कडे गेल्याने इंच्छुक उमेदवार व पक्षाचा कमालीचा हिरमोड झाला.त्यामुळे संजय खाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही बंडखोरी कुणाच्या पथ्यावर पडेल?याबाबत मतदारांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.भारतीय जनता पार्टी कडून मतांचे विभाजन व्हावे असा जोरकस प्रयत्न चालविला जात आहे.मनसे कडे युवकांची फळी जमेची बाजू आहे.वणी मतदारसंघात चौरंगी लढत झाल्यास व महाविकास आघाडीच्या अंतर्गत वादाचा परिपाक नेमकी कुणाच्या पथ्यावर पडेल हे कुण्या ज्योतिष्याला विचारण्याची गरज मतदाराला उरणार नाही एवढे मात्र निश्चित.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment