– प्रा. शाम मानव यांची खंत : मारेगाव येथे व्याख्यान
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
सामाजिक आणि आर्थिक विकास करीता संविधानातील आरक्षणाची नितांत गरज आहे. हा देश संविधान शिवाय वाचणार नाहीच. मात्र असे असतांना हे संविधानच बदलवू पाहणाऱ्यांना व घाणेरड्या संस्कृती लादणाऱ्यानां आता घरी पाठविण्याच्या तयारीला लागा. संविधानावर सजग होण्याची, परिवर्तन घडविण्याची नितांत गरज आता बनली आहे अन्यथा पुरोगामी महाराष्ट्र नावापुरताच राहील, महाराष्ट्राचा सत्यानाश होईल अशी खंत अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, प्रसिद्ध विचारवंत शाम मानव यांनी मारेगावात व्यक्त केली.
ते 19 ऑगष्ट रोजी मारेगाव येथे आयोजित जाहिर व्याख्यान सभेत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. प. चे माजी महिला व बालकल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर होते. तर ज्येष्ठ साहित्यिक दशरथ मडावी हे विशेष अतिथी होते.
प्रसिद्ध विचारवंत शाम मानव पुढे म्हणाले, महाराष्ट्रातच नव्हे तर देशात मृतांच्या ढीगाऱ्यावरून सत्तेचा सोपान चढने सुरू आहे. मानसा माणसात द्वेष निर्माण करणारे सरकार स्थापन होत आहे.लोकशाहीची व कायदे पायाखाली तुडवत देशद्रोह सारखे सरकार स्थापन होत आहे, ही चिंतनीय बाब आहे. खोक्याचे सरकार प्रस्थापित करणे हे उघड्या डोळ्यांनी जनता बघत आहे. ईडी ची दहशत दाखवून नेत्यांना नामोहरम करण्यात येत आहे. बलात्कारी बुवा, बाबा, महाराज हे लोकांना दिशाहीन करीत आहे. सरकार मात्र अश्या बाबागिरीच्या सोबत आहे.लोकशाहीची अवस्था काय होईल याची कल्पना न केलेली बरी.सरकार स्थापन करणाऱ्यांची मनोवृत्ती काय? मनुवादी, सांप्रदायीक बुवाबाजींचे सरकार. ही संस्कृती निट समजून घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
वर्तमान सरकारचे आतून बाहेरून हादरविणारे गंभीर किस्से विषद करतांना प्रा. मानव यांनी परिवर्तनवाद्यांनी संविधानावर सजग होण्याची गरज प्रतिपादित केली.यासोबत शेतकऱ्यांच्या उत्पादन मूल्यानुसार भाव मिळण्याची गरज आहे. अनेक प्रकल्प गुजरात हलविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील असवैधानिक सरकारने नौकर भरती बंद केली पर्यायाने बेरोजगार युवकांचा रेशो वाढला, अशी टीका केली. द्वेष आणि संप्रदायीकतेचे विष संपविण्यासाठी आता परिवर्तन वाद्यांनी तत्पर अन सजग राहण्याची गरज आहे.
प्रस्ताविकेतून साहित्यिक दशरथ मडावी यांचा प्रहार
संविधानाने माणूस म्हणून ओळख दिली. मात्र, अलीकडेच धर्मांध शक्ती वाढीस लागल्याने सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी पुढे सरसावण्याची गरज आहे.अन्यथा लोकशाहीचा डोलारा उध्वस्त होईल.400 पार ही संविधान बदलविण्याच्या गर्जनेला महाराष्ट्र व उत्तरप्रदेश च्या मतदारांनी चपराक मारली. येणाऱ्या काळात लोकशाहीवादी सरकार आणण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक दशरथ मडावी यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीत कॉ. अनिल हेपट, अनिल देरकर, अनंता मांडवकर, मारोती गौरकार, उदय रायपुरे, भारत मत्ते, लहू जिवतोडे, कॉ. बंडू गोलर, रामभाऊ जिड्डेवार, उदय रायपुरे, आदींची उपस्थिती होती.
व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन अँड. मेहमूद पठाण यांनी तर आभार प्रदर्शन बंडू गोल्हर यांनी केले.
व्याख्यान ऐकण्यासाठी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.