– कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका
-सैल केलेली वाळू तस्करी भोवली
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
तालुक्यातील बहुचर्चित कोसारा वाळू घाटात होणाऱ्या अवैध तस्करीला लगाम घालण्याऐवजी सैल पणा आणल्याचा ठपका ठेवत कोसारा सांजा चे तलाठी नझरूल इस्लाम अब्दुल कय्युम (शेख पटवारी ) यांना निलंबित करण्यात आल्याचा आदेश निर्गमित करण्यात आल्याने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील कोसारा लगत वर्धा नदी पात्रात रेती घाट असून शासनाकडून हा घाट लिलाव करण्यापूर्वी वाळू तस्करांना मुभा देण्याचा ठपका सदर तलाठ्यावर होता. बेभान झालेल्या वाळू तस्करांनी चोरटी वाहतूक करीत लाखो रुपयांचा शासनाचा महसूल घशात घातला मात्र सांजातील कारवाईला भोपळा दाखविण्यात येत होता.दरम्यान, नायब तहसीलदार व मंडल अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गौण खनिज उत्खनन कारवाईसाठी सहाय्यक म्हणून सदरील तलाठी यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र येथेही ठेंगा दाखविण्यात येत होता. परिणामी, मुख्यालयी न राहणे, वरिष्ठ्यांच्या सुचनेचे पालन न करणे, प्रशासकीय सेवेतील कर्तव्याचा भंग करणे आदी कारनांचा त्यांचेवर ठपका ठेवून तशा आशयाचा अहवाल वरिष्ठाकडे पाठविण्यात आला.
अहवालाचे गांभीर्य पाहून शेख पटवारी यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. मात्र स्पष्टीकरणही संयुक्तिक नसल्याने उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी तलाठी यास निलंबित केल्याचा आदेश निर्गमित केला आहे. दरम्यान, त्यांची विभागीय चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
तहसीलदार शिवारात अन वस्तीत… तस्कर प्रचंड दहशतीत..!
महसूल प्रशासनात कर्तव्याची जाणीव ठेवून तहसीलदार उत्तम निलावाड यांनी वाळू तस्करांच्या चांगल्याच मुसक्या आवळत अवैध वाळू व्यवसायिकात प्रचंड दहशत निर्माण करीत करोडो रुपयांचा महसूल वाचविण्यात यश मिळविले.वेगवेगळे पोशाख परिधान करणे, ट्रक – दुचाकीने रात्री बेरात्री जाऊन कपाशीत व शिवारात आणि वस्तीत कुणालाही न सांगता दडून बसने, गावला जातो म्हणून सांगणे आणि तस्करावर पाळत ठेवणे, वेषांतर करीत धडक कारवाई करणे हेच त्यांच्या कडक कारवाईचे विशेष “गमक” ठरले. वीस पेक्षा जास्त वाहनावर कारवाई करीत शासनाचा करोडो रुपयांचा महसूल वाचविण्यात यशस्वी ठरल्याखेरीज तस्करात प्रचंड खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे कारवाईसाठी पथक कार्यान्वित करीत प्रशासनातील पारदर्शकता तहसीलदार निलावाड यांनी अधोरेखित केली.कुणालाही खतपाणी न घालता अवैध वाळू तस्करावरील कारवाईसाठी ‘एकला चलो’ ची तहसीलदार निलावाड यांची भूमिका तालुक्यात विशेष चर्चेत आहे.