– राष्ट्रवादी नंतर भाजप व आता काँग्रेस मध्ये प्रवेश
– प्रवेशाचा करिष्मा, पाणी पुरवठा सभापती पद नरांजे यांच्या वाट्याला
मारेगाव : दीपक डोहणे
अवघ्या देशात ईडी सीबीआय च्या भितीने व पदाच्या लालसेने राजकीय नेत्यांचे पक्षांतर नविन राहिला नाही. असाच प्रत्यय मारेगाव येथे येत येथील नगरसेवक यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर नगरसेवकाची माळ गळ्यात घातली.तब्बल दोन वर्षांनी त्यांनी मागील चार तारखेला भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला.येथेही त्यांची घुमसट झाल्याने या बहुचर्चित नगरसेवकाने अवघ्या सतरा दिवसात भाजपला सोडचिट्ठी देत काँग्रेस मध्ये प्रवेश केला. या प्रवेशाचा खास ‘नजराना’ म्हणून नगरपंचायतच्या पाणी पुरवठाचे सभापती पदाचे वाटेकरी ते बनले. अवघ्या दिवसात पक्षांतर करणारे हे आहे प्रभाग क्रमांक 12 चे अनुसूचित जाती प्रवर्गाचे नगरसेवक हेमंत नरांजे…!
अलीकडच्या राजकारणात स्वाभिमान व निष्ठा दुरापास्त झाल्याचे सर्वत्र चित्र आहे. देशात चौकशीचा ससेमीरा चुकविण्यासाठी व राजकीय पदाच्या लालसेने अनेकांनी आपला सावध पवित्रा घेत कोलांटउड्या सुरु केल्याचे दिसते आहे. चौकशीच्या ससेमीराचा तिळमात्र संबंध नसतांना वर्तमान स्थितीतील पदाची माळ व आगामी काळातील प्रथम नागरिकांचा बहुमान पटकविण्यासाठी येथील नगरसेवकाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्हाया भाजप व अवघ्या 17 दिवसात राजकीय कोलांटउडी घेत आज बुधवारला कॉग्रेस पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत घड्याळ व कमळ सोडत ‘पंजा’ हातात घेतला. हा हात किती दिवस त्याच्या हातात राहील? याबाबत नागरिक तर्ककवितर्क जोडत असला तरी तूर्तास नगरपंचायत चे एक सभापती पद पाणी पुरवठा च्या रूपात त्यांच्या वाट्याला आला आहे.राजकारणात केव्हाही काहीही होवू शकते ह्याचा प्रत्यय मारेगाव वासियांना या पक्षांतराने आला असला तरी “राजकारणात” हे फारसे वावगे ठरू नये.
सभापती पदासाठी महाविकास व सयुक्त विकास आघाडीचा बोलबाला
मारेगाव नगरपंचायत मध्ये आज झालेल्या सभापती निवडणुकीत महाविकास व सयुक्त विकास आघाडीचा गट निर्माण करीत समन्वय साधण्यात आला. यात काँग्रेस व मनसे असे 9 तर शिवसेना (उबाठा)4 नगरसेवकांची मोट बांधण्यात आली. सभापती पदे महाविकास आघाडीच्या वाट्याला आले. येथील नगरपंचायत मध्ये नगरसेवकाचे भारतीय जनता पार्टी चे 4 – काँग्रेस 7 – शिवसेना – 4 महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2 असे पक्षीय बलाबल असतांना महाविकास आघाडी व सयुक्त विकास आघाडीचा वरचष्मा राहिला. यात नव्याने सभापती पद वाट्याला आलेल्यात मनसेच्या अंजुम शेख यांचेकडे बांधकाम – वर्षा किंगरे आरोग्य व हेमंत नरांजे आजच काँग्रेसवासी झाल्याने त्यांना पाणी पुरवठा सभापती पद बहाल झाले.भाजप च्या उपाध्यक्ष असलेल्या हर्षा महाकुलकर यांना पदसिद्ध अधिकार असतांना महिला बालकल्याण सभापती पद त्यांचेकडे कायम आहे तर उपसभापती पदाचा भार थारांगना खालीद पटेल यांचेकडे सोपाविण्यात आला.
राजकारणात प्रामुख्याने एखाद्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत असतांना प्रत्येकाला पदाचा हव्यास असतो मात्र आजच्या निवडीसाठी आपण अनेकदा वरिष्ठानां साकडे घातले मात्र सकारात्मक दुजोरा मिळाला नसल्याने आपण काँग्रेस मध्ये प्रवेश केला व नगरसेवक ते सभापती असा शिक्कामोर्तब केला.
हेमंत नरांजे
नवनियुक्त पाणी पुरवठा सभापती
नगरपंचायत, मारेगाव