– वाळू तस्कर व प्रशासकीय कर्मचाऱ्यात शाब्दिक चकमक
– आरोप प्रत्यारोपात ‘तक्रार सैल’
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव तालुक्यात वाळू तस्करी आता जिवावर उठत आहे. तस्करीसाठी वाट्टेल ते शक्कल लढवित वाळू तस्कर टोकावर पोहचत आहे.वाळूची तस्करी सुरु असतांना प्रशासकीय पथकाने ‘ते’ वाहन रोखत चौकशीचा ससेमीरा सुरु केला.काही कळण्यापूर्वीच मागावून येणाऱ्या वाहनातून चार ते पाच युवक धारदार शस्रसह खाली उतरले.पथकात दहशत, भिती अन घाबरगुंडी झाल्याने मारेगाव कडे काढता पाय घेतला.ही सिनेस्टाईल घटना मारेगाव तालुक्यातील करणवाडी फाट्यावर बुधवार ला रात्री घडल्याची खमंग चर्चा आज दिवसभर मारेगावात चर्चेचा विषय नागरिक चवीने न्याहाळत आहे.
मारेगाव तालुक्यात प्रमुख दोन रेती घाट आहे. मात्र जनतेसाठी हे रेतीघाट अजूनही बंद अवस्थेत आहे. त्यामुळे अनेकांचे खासगी, शासकीय कामे पुरते खोळंबले आहे. त्यामुळे तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
अशीच एक घटना बुधवार ला रात्री करणवाडी फाट्यावर घडल्याची चर्चा जोर धरत आहे. कुंभा मार्गाने येणाऱ्या वाहनात वाळू असल्याने प्रशासकीय पथकाने आडवे होत कारवाई साठी चौकशी सुरु केली. तोच अवघ्या वेळात मागावून आलेल्या वाहनातून चार ते पाच युवक धारदार शस्र घेवून पथकासमवेत रंगीत तालीम करीत शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. या थरारक घटनेने पथकाने काढता पाय घेत पोलीस स्टेशन गाठले. मात्र ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत ते युवकही ठाण्यात आले आणि येथे सुरु झाले आरोप प्रत्यारोपांच्या फैरी व या फैरीतच तक्रारी ‘सैल’ झाल्याची चर्चा आज मारेगावात घिरट्या घालत होत्या.
परिणामी, या थरारक घटनेत मोठा अनर्थ टळला असला तरी प्रशासनासमोर भले भले नांगी टाकणारे या घटनेवरून नेमके कोण हतबल झाले? हा प्रश्न येथे अनुत्तरीत ठरला.यासंदर्भात संबंधित अधिकारी यांचेशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न प्रस्तुत प्रतिनिधीने केला असता प्रतिसाद दिला नाही.