Breaking News

संवेदना… काँग्रेसचे जिल्हा सचिव मुन्ना कुरेशी यांचे निधन

दीर्घ आजाराने सामाजिक ,राजकीय व धार्मिक चळवळीचे अग्रणी हरविल्याने शोककळा

– मारेगाव येथे आज अंत्यसंस्कार

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

अख्ख आयुष्य राजकारणात भिंगरी सारखं फिरवित सामाजिक व धार्मिक क्षेत्रात वेगळेपणाचा ठसा उमटवून त्रिसूत्री चळवळीचे अग्रणी तथा जिल्हा काँग्रेसचे सरचिणीस शरीफ अहेमद शफीक अहेमद कुरेशी (मुन्ना कुरेशी)यांचे मारेगाव येथील स्वगृही आज बुधवारला दुपारी २.३० वाजता निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय ७७ होते.

 

मागील अनेक दिवसापासून मुन्ना कुरेशी यांना आजाराने कवेत घेतले होते.आजारपणाने कुठल्याच चळवळीत सहभाग घेता येत नसल्याची खंत त्यांच्या उराशी असतांना त्यांनी यापूर्वी मारेगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच पद भूषविले होते.खरेदी विक्री संघाचे ते बराच काळ अध्यक्ष यासह मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते.गौसिया मस्जिद कमिटीच्या अध्यक्ष पदाचा भार त्यांनी स्वीकारला यासोबत राजकीय क्षेत्रात आपली सलगी निर्माण करीत वर्तमान स्थितीत ते जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदावर आरूढ होते.त्यांचा सामाजिक , राजकीय व धार्मिक क्षेत्रात निकटचा सबंध असतांना या त्रिसूत्री चळवळीचे अग्रणी म्हणून त्यांनी तालुक्यात आपली वेगळी छाप अधोरेखित केली होती.

 

दरम्यान , दोन दिवसापूर्वी त्यांच्यावर नागपूर येथे पोटाची शस्रक्रीया करण्यात आली.प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर काल मारेगाव येथे परत येत असताना वरोरा नजिक प्रकृतीत बिघाड झाला.वरोरा येथील उपचाराअंती डॉक्टरांनी ब्रेन हॅमरेज झाल्याचे घोषीत केले.

 

आज सकाळी मारेगाव येथे निवासी आणल्यानंतर त्यांना कृत्रिम प्राणवायू वर ठेवण्यात आले.अखेर दुपारी २.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.शेती हा मुख्य व्यवसाय करणारे मुन्ना कुरेशी यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा व चार मुली, नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे.स्थानिक कब्रस्थान येथे उद्या सकाळी १० वाजता अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment