–मारेगाव येथे मराठी वाड्मय मंडळाचे उदघाटन
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
भारतातील ज्ञान, विज्ञान आणि सांस्कृतिक आदान-प्रदान प्रक्रियेमध्ये महानुभाव संप्रदायातील सर्वज्ञ विचारधारा ही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडताना आपणास दिसते. सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी केवळ ज्ञान निर्मितीच केली नाही तर विविध ज्ञान शाखांना पुनर्जीवित करून भारतातील ज्ञान साधनेच्या प्रक्रियेला नवी दिशा दिली. नवे अंकुर दिलेत. महानुभाव संप्रदायाने मांडली संकल्पना आज पुरोगामीत्वाच्या दिशेला वाटचाल करणाऱ्या विचारांची समृद्ध संहिता ठरते. एकूणच सर्वज्ञ हा पुरोगामीत्वाचा ज्ञानांकुर ठरतो,असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.प्रवीण बनसोड यांनी व्यक्त केले.
मारेगाव येथील कला,वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये मराठी विभागतर्फे आयोजित मराठी वाड्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून त्यांनी आपले विचार येथे मांडलेत. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.अण्णा वैद्य उपस्थित होते. सोबतच लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख आणि जेष्ठ समीक्षक डॉ.अजय देशपांडे देखील प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी दै. सकाळ द्वारा श्री चक्रधरस्वामी अवतरण अष्टशताब्दीपर्वाच्या निमित्ताने संपादित “सर्वज्ञ” विशेषांकाचे यावेळी लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.अण्णा वैद्य यांनी महानुभाव संप्रदायाची विचारधारा आणि आजची जीवनशैली याचा तुलनात्मक आढावा घेऊन सर्वज्ञ विचारधारा आज किती महत्वपूर्ण आहे, याचे महत्त्व विशद केले. डॉ.अजय देशपांडे यांनी सर्वज्ञ विचारधारा ही सर्वकालिका, सार्वत्रिक आणि नियमितपणे आपण स्वीकारतोच परंतु यातील जाणीव मात्र आपण अनावधानाने स्वीकारत नाही. सर्वज्ञांच्या विचारांच्या अभ्यास मालिकेतून आपणास या जाणिवा जिवंत करता येतील,याचे महत्त्व त्यांनी याप्रसंगी अधोरेखित केले.प्राचार्य डॉ.अविनाश घरडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून स्थानिक परिसरातील महानुभाव आणि त्यांचा या परिसरावर असलेला प्रभाव आणि त्याचे महत्त्व विस्तृतपणे मांडले. महाविद्यालयातील मराठी वाड्॰मय मंडळाची अध्यक्ष म्हणून बी.ए. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी खूप सानिका लाडे हिची यावेळी निवड करण्यात आली, याबद्दल तिचा आणि वांड्॰मय मंडळ सदस्यांचा येथे यथोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि भूमिका डॉ.राजेश चवरे यांनी मांडली. संचालन डॉ.वर्षा गणगणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा .श्रीकांत सूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रो.डॉ.गजानन सोडनर,डॉ.विनोद चव्हाण,डॉ. नितेश राऊत, डॉ.अनिल अडसरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा विद्यार्थीवर्ग व प्राध्यापकवृंद बहुसंख्येने उपस्थित होते.