– डॉक्टरांच्या सतर्कतेने पर्दाफाश
– मारेगाव तालुक्यातील घटना
मारेगाव : दीपक डोहणे
त्या दोघात नात्याची झालर..नजरानजर झाली..दोघेही एकमेकांना पसंत करू लागले..आपण अल्पवयीन असल्याची तिचे भान हरपले..प्रेमात आकंठ बुडाली..एवढेच नव्हे तर ते दोघे लिव्ह ईन रिलेशनशिप मध्ये राहू लागले..सर्वस्व अर्पण करीत तिच्या पोटात अंकुराची वाढ झाली..प्रसूतीसाठी सेवाग्राम गाठले..डॉक्टरांकडून सखोल चौकशी झाली..काही वेळातच तिने गोंडस बाळाला जन्म दिला..मात्र अत्यल्प वयामुळे कायद्याच्या चाकोरीत सापडत डॉक्टरांनी पोलिसात माहिती दिली..आणि तो पोटच्या गोळ्याला बघण्यापूर्वीच त्याची यवतमाळ जेलवारी झाली. लिव्ह ईन..अन त्यातच ती अल्पवयीन.. मारेगाव तालुक्यातील घटनेने खळबळ उडाली आहे.
अलिकडेच लिव्ह ईन रिलेशनशिप हा शब्दच खूपच प्रचलित आहे.युरोपातील हा शब्द भारतात पोहचला.याचा विपरित परिणाम ग्रामीण व शहरी भागातील तरुणाईवर झाल्याचे सर्वत्र पाहावयास मिळते.असाच एक प्रकार मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथे घडला.
ती केवळ 15 वर्षाची असतांना 18 वर्षीय नातेवाईक युवकाच्या प्रेमात आकंठ बुडाली.दिवसागणिक प्रेमाला उपमा नाही म्हणत त्यांचे प्रेम बहरत गेले.अवघ्या दिवसातच त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.लिव्ह इन..मध्ये राहू लागले.अशातच तिच्या पोटात अंकुराची वाढ झाली आणि तिचे वय 17 झाले.प्रसूतीसाठी सेवाग्राम ला गेले.डॉक्टरांनी प्रसूतीपूर्वीची सखोल चौकशी केली.चौकशी दरम्यान मुलीचे वय कमी असल्याने डॉक्टरांनी थेट मारेगाव पोलिसात फोन केला.आणि संशायित अजय भारत तोडासे रा.चिंचमंडळ यांचेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दवाखान्यात वेदनेने विव्हळत तिची प्रसूती होवून गोंडस बाळ जन्माला आले.मात्र कायद्याच्या चाकोरीतून ती अल्पवयीन ठरल्याने हा गुन्हा अधोरेखित झाला.गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण त्याला लागली आणि तो पसार झाला.मारेगाव पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून त्याला अटक केली.तूर्तास त्याचा मुक्काम यवतमाळ कारागृहात असतांना अल्पवयीन मुलीसोबत लिव्ह ईन रिलेशनशिप कसे अंगलट आले याची प्रचिती या घटनेने उजागर झाले.बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याची माहिती असली तरी शिशुचा बाप कारागृहात आहे.पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.