– तहसील मार्फत पोलीसात तक्रार दाखल
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
ते चौघे.. गळ्यात बनावट शासकीय ओळखपत्र.. चार चाकी वाहनातून थेट तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांचे घरी धडकतात.. तपासणीसाठी रजिस्टर्ड मागवितात..अचानक टाकलेल्या छाप्यात दुकानदारांची भंबेरी उडतात..धान्य वितरित करण्यात अचूक बोट ठेवण्याच्या प्रयत्नात तडजोडी साठी मागणी घालतात…त्याला काहीसा प्रतिसाद देत दुकानदार तोडकी भेट देतात..आणि हे अधिकारी दुसरीकडे मोर्चा वळवितात… काही तासातच बिंग फुटतात…हे अधिकृत अधिकारी नव्हे तर तोतया अधिकारी असल्याची खातरजमा होते..तालुक्यातील रास्त भाव दुकानदार प्रशासनात तक्रार नोंदवतात… अन तालुक्यात घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडते..आता ते नेमके तोतया अधिकारी कोण ? याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
.तालुक्यातील नवरगाव, करणवाडी, मैसदोडका येथील रास्त भाव दुकानदारांना तोतया अधिकाऱ्यांनी धमकावीत लुटण्याचा प्रकार समोर आला आहे.
मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथील रास्त भाव दुकानदार पी .डी .चव्हाण यांच्या दुकानात चार चाकी वाहनाने चार अनोळखी इसम आले.आम्ही भारतीय खाद्य निगम महामंडळाचे अधिकारी आहोत. लाभार्थ्यांना धान्य वितरित केल्या जात नसल्याची माहिती आहे. त्या अनुषंगाने दुकानाची तपासणी करायची आहे असा दम भरत तब्बल वीस हजाराची मागणी केली.
कारवाई टाळण्याकरिता संबंधित दुकानदाराने हजार रुपये तोतया अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर संबंधितांनी करणवाडी येथील रास्त भाव दुकानदार एस. एन .काळे यांच्या सुद्धा दुकानाची तपासणीच्या नावाखाली 20000 रुपयाची मागणी केली. तसेच नवरगाव येथील बी.पी. दारुंडे यांच्या रास्त भाव दुकानात भेट देत दोन हजार रुपये घेतले. यानंतर संबंधितांनी चौकशी केली असता सदर कुठलीही तपासणी पथक तालुक्यात नसल्याची बाब उघड झाली.
यानंतर संबंधित रास्त भाव दुकानदारांनी रीतसर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीचा छडा कुठपर्यंत लागतो याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
संबंधित तोतया अधिकाऱ्यांनी मारेगाव शहरातील शासकीय गोदामाची तपासनीच्या गोडस नावाखाली भेटही घेतली आहे. त्याचबरोबर तोतया अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात त्यांचे वाहन उभे करून येथील काही अधिकाऱ्यांशी सांगोपांग चर्चा सुद्धा केल्याची माहिती पुढे येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या गळ्यात बोगस आय कार्ड असल्यामुळे अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांची चांगलीच दिलजमाई केल्याची खमंग चर्चा रंगत आहे.
रास्त भाव दुकानदाराकडून आलेली तक्रार जशीच्या तशी मारेगाव पोलिसात फॉरवर्ड करण्यात आली आहे.
-उत्तम निलावाड
तहसीलदार मारेगाव