– कान्हाळगावच्या मंदिरात ओशाळला मृत्यू
– लोकवर्गणीतून केले अंत्यसंस्कार
मारेगाव : दीपक डोहणे
वेदनेची अचूक नस पकडणाऱ्या नामवंत गझलकार सुरेश भट यांनी ‘इतकेच मला जातांना सरणावर कळले होते , मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’..अशी भळभळीत जखम अधोरेखित केली होती.नेमके असेच काहीसे भोग मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव येथील धम्मपाल नामदेव खोब्रागडे यांच्या वाट्याला आले.त्याच्या थरथरत्या जगण्याचा संघर्ष मानवता हरवलेल्या अनेकांच्या डोळ्यांच्या पापण्या जड करून गेले. मात्र येथील सर्वच सामाजिक – राजकीय संघटना दिखाऊ ठरल्या. अनेकांचे मानवी मनही पाझरले नाही अन धम्मपाल याचा मंदिरातच रविवारला तडफडता मृत्यू झाला.
मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव हे छोटंसं गाव. येथील पन्नास वर्षीय धम्मपाल खोब्रागडे याच्या जगण्यात डोंगरा एव्हढे दुःख होते.मजूर असणाऱ्या धम्मपाल ला अर्धांगवायूचा आजार झाला होता.ऐन तारुण्यात पछाडलेल्या या दुर्धर आजाराने त्याच्यावर अकाली प्रौढत्व आले. जगण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात त्यास भीक मागून पोटाची खळगी भरावी लागली. जीवनसाथीचे हे हाल बघून पत्नी सुनीताही मानसिक आजारी झाली. अन दोघांचीही जिंदगीच डावावर लागली.आजाराशी संघर्ष करणाऱ्या दाम्पत्याला व्यवस्थेने पूर्णतः नाकारले. दूर्भाग्याचा फेरा चुकेनासा झाला.ते थरथरत्या हातापायाने दोन किमी.अंतरावर असलेल्या मारेगाव येथे यायचे.दहा पाच रुपये मागायचे , मिळेल त्या चतकोराने पोटाची खळगी भरायची अशी केविलवाणी व दुर्देवी स्थिती त्यांच्या वाट्याला आली होती.
या दाम्पत्याच्या मनाची व प्रकृतीची व्यथा मांडणारी करुण कहाणी व जगण्याचे भयाण वास्तव यापूर्वीच “विदर्भ टाईम्स” ने प्रकाशित केले होते. मात्र पंगू बनलेल्या ढोंगी राजकारणी व सामाजिक संघटनेचा गवगवा करणारे त्यांच्या मदतीला कधीच आले नाही. खोब्रागडे दाम्पत्याच्या वेदनादायी जगण्याची सर्कस सारेच उघड्या डोळ्यांनी बघत होते.हेच येथे दुर्देव.
जगण्याचा प्रवास मनाने हरलेल्या धम्मपाल खोब्रागडे यांनी दोन दिवसांपूर्वी कान्हाळगाव स्थित मंदिरात आश्रय घेतला.जगाचा निरोप घेण्याची वेळ झाली हे त्यांना कळून चुकले आणि रविवार ला सकाळी 11 वाजता गावातील मंदिरातच धम्मपाल याने तडफडत अखेरचा श्वास घेतला.मानसिक आजारी असूनही रात्र दिवस पतीची सावली बनून राहणारी सुनीता मात्र यावेळी सैरभैर अवस्थेत निंबाळा येथे फिरत होती.पती गेला आणि आपण एकाकी झाले हे कळल्यावर ती भावशून्य झाली. नित्यनियमाने येणारे हे दाम्पत्य आता ती एकटेपणात दिवस कंठणार आहे.हिच्यासाठी तरी कोणी सरसावणार काय ? हा प्रश्न अधांतरी आहे.
धम्मपाल खोब्रागडे यांचेवर कान्हाळगाव वासीयांनी लोकवर्गणी करून अंत्यसंस्कार केले.धम्मपाल यांचे जगणे काळीज पिळवटून टाकणारे असतांना त्याच्या मृत्यूने “इतकेच मला जातांना सरणावर कळले होते ..मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते”..इतकसं म्हणणं चिंतन करण्यास पुरेसं आहे.