– भाजपायुमो चे राजेश पांडे यांची वरिष्ठांकडे तक्रार
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव तालुक्यातील रुग्णांशी अनाहूतपणे खेळ खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे राजेश पांडे यांनी वरिष्ठांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील डॉ.हाजरा व मारेगाव येथील डॉ. दास हे रुग्णांसोबत नको ते उपचार करून स्वतः जवळील औषधी अव्वाच्या सव्वा भावाने देत असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.तद्वतच खुलेआम अँलोपॅथीची प्रॅक्टिस सर्वश्रुत असतांना गरीब रुग्णांची लूट करीत आहे. वाजवीपेक्षा अधिकचा डोस देत आर्थिक लूटमार करीत असल्याचाही आरोप आहे.
दरम्यान , मारेगाव तालुका प्रशासनाने ही गंभीर बाब हेरून त्यांच्यावर छापा टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. या बोगस डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. थाटलेली बोगस दवाखाने कायम बंद करून रुग्णांची होत असलेली ससेहोलपट थांबवावी अशा आशयाची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.या गंभीर गोरखधंद्यावर लगाम न लागल्यास आपण लवकरच महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांचेशी थेट भेट घेऊन तक्रार करणार असल्याची माहिती पांडे यांनी दिली.