– महिला कांग्रेसच्या नेतृत्वात दिले मारेगावात निवेदन
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
काल लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस खासदार राहूल गांधीवर टीका करतांना मारेगाव तालुक्यातील जळका येथील कलावतीच्या घरी भेट देऊन तिला वाऱ्यावर सोडले तर मोदी सरकारणे तिला घर, वीज, पाणी,शौचालय,अन्न धान्य आदी मदत पोचविली अशी टीका केली होती. या बाबत कलावती बांदुरकर यांनी आज तहसीलदार मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन पाठवून केंद्रीय मंत्री अमित शहा हे धांदात खोटे बोलले असून संसदेत खोटी माहिती देणाऱ्या शहावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
गुरुवारला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मी वृत्त पाहिले आणि आश्चर्य वाटले.जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या पैकी माझ्या पतीची शेतकरी आत्महत्या असतांना काँग्रेसचे राहूल गांधी माझ्या घरी पंधरा वर्षांपूर्वी आले.सामाजिक संवेदनशीलता असलेल्या राहुल गांधी यांच्या माझ्या घरची आणि घडलेल्या घटनेचे सूतोवाच दिल्ली दरबारी केले आणि म्हणूनच मला जगण्याचा नवा गवसला.
तत्पूर्वी मी अठरावीश्व दारिद्र्यात सात मुली व दोन मुलांचा सांभाळ करीत होती.राहूल गांधीच्या भेटीने मला 36 लाखाची आर्थिक मदत सुलभ संस्थेने केली.
तत्कालीन कांग्रेस प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, मारेगाव पंचायत समितीच्या तत्कालीन सभापती अरुणा खंडाळकर यांनी इंदिरा आवास योजनेतून घरकुल,नळ, शौचालय, वीज, टीनपत्रे आदी मदत उपलब्ध करून दिली.अशी माहिती निवेदनातून केली आहे.या उलट मोदी सरकारच्या काळात मला कोणतीही मदत मिळाली नाही. असा आरोप कलावती ने या निवेदनातून केला आहे.
लोकसभेत खोटी माहिती देऊन देशाची फसवणूक करणारे गृहमंत्री शहा यांना योग्य ती समज द्यावी अन्यथा मला कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल अशा इशारा मोदी यांना पाठविलेल्या पत्रातून केला आहे.
आज मारेगाव तालुका कांग्रेस पक्षाचे वतीने कलावतीने तहसीलदार यांचे मार्फत पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले. निवेदन देतांना महिला कांग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष अरुणा खंडाळकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल देरकर,माया पेंदोर, शकुंतला वैद्य, रवींद्र धानोरकर, उदय रायपुरे, खालिद पटेल, शाहरुख शेख , माया गाडगे, जगदीश खडसे आदी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.
राहुल गांधी मुळेच सजग जगण्याची प्रेरणा मिळाली
पतीच्या आत्महत्येनंतर जगण्याचे चटके सहन करतांना काँग्रेसने राहुल गांधींच्या रुपात देव माणूस घरापर्यंत पाठविला. त्यांना आमच्या वेदनादायी बिकट परिस्थितीचा लेखाजोख दिल्ली दरबारी मांडला.लगेच सुलभ इंटरनॅशनल संस्थेचे डॉ. बिंदेश्वर पाठक आलेत आणि माझ्या खात्यात तब्बल 30 लाख रुपये फिक्स डिपॉझिट केलेत.शिरावर असलेल्या कर्ज फेडीसाठी 6 लाख रुपये रोख दिलेत.यातूनच कुटुंबातील सजग जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली एवढेच नाहीतर खचलेल्या मनाला राहुल गांधी मुळेच उभारी मिळाली हे मात्र येथे त्रिवार सत्य.
श्रीमती कलावती बांदूरकर
जळका ता. मारेगाव