– आवळगाव जंगलातून अन्न व औषधी प्रशासनाने केला जप्त
– वणी येथील ठोक विक्रेता संशयाच्या भोवऱ्यात
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
तालुक्यातील पांढरदेवी देवस्थान परिसरातील आवळगाव जंगलात मुदतबाह्य बेवारस औषधी साठा आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.यांची कुणकुण लागताच अन्न व औषध विभागाने थेट घटनास्थळ गाठत अंदाजे दीड लाखाचा साठा जप्त करीत न्यायालयाचे स्वाधीन करण्यात आले.याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहेत. तर वणी येथील एका ठोक औषधी विक्रेत्यांवर आता कारवाईची टांगती तलवार उभी ठाकली आहे.
मारेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आवळगाव जंगलात 7 जुलै रोजी मुदतबाह्य औषध साठा बेवारस अवस्थेत आढळून आला.यात हात स्वच्छ करण्याचे सॅनिटाइझर च्या बॉटल्स , इंजेक्शने , विविध प्रकारच्या औषधी , बालकांचे ड्रॉप आदी औषधींचा समावेश होता.सदर साठा जंगल व्याप्त परिसरात असल्याने मानवासह वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात आणण्याचा सपशेल प्रयत्न करण्यात आला होता.
मात्र याबाबतची वन विभागास माहिती प्राप्त होताच अन्न औषधी प्रशासन चे आयुक्त मिलिंद काळेश्वर यांना देण्यात आली.गंभीर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आयुक्त यांनी दोन दिवसांपासून तपासाची चक्रे गतिमान करीत साठा जप्त करीत मारेगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयात सुपुर्द केला.
दरम्यान या साठ्या संदर्भात मुख्य खलनायकाची भूमिका अधांतरी असतांना आयुक्तांनी थेट चौकशीचा पारदर्शक समेमिरा समोर
आणला आणि पोलिसात संभाव्य वणी – पांढरकवडा येथील या ठोक औषधी विक्रेत्या विरोधात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले आहे.त्यामुळे त्याचेवर आता कारवाईचा बडगा उभा आहे. तो औषधी बेवारस टाकणारा नेमका खरा खलनायक कोण ? याबाबतची उत्सुकता जनसामान्यांत शिगेला पोहचली आहे.