संपादकीय लेख :
✍️दीपक डोहणे
एखाद्या शहराची ओळख ही तिथली सांस्कृतिक समृध्दी यावर ठरत असते. तेथील सामाजिक जडणघडण कशी आहे यावर शहराचा वैभव दिसून येतो. सध्या मारेगावात अचानक आलेली एक सामाजिक खाज मारेगावकर साठी चिंतनाचा विषय ठरत आहे. यामुळे शहराची ओळख विद्रूप अन् बकाल होण्याच्या मार्गावर आहे.
एकेकाळी नव्वद च्या दशकात मारेगाव शहराला सांस्कृतिक चळवळीचा वारसा लाभला होता. त्यावेळी येथील महाविद्यालयीन युवक – युवतींनी नाटक, गायन, वक्तृत्व, चित्रकला या क्षेत्रात मारेगाव चे नाव राज्यभर केले होते.मराठी चित्रपट सृष्टीचे निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, रोहिणी हट्टनगडी सारखे दिग्गज कलाकार मारेगावच्या मायभूमीत उतरले, अनेक सांस्कृतिक, सामाजिक , साहित्यिक मेळावे इथे झाले. स्व. बोरेवार मिस्त्री, हरिप्रसाद पांडे सर, विठ्ठलराव चौधरी सर, नवरगाव चे ज्ञानेश्वर मुन यांनी एकशे एक सुंदर नाटक सादर केले. ख्यातनाम दिवंगत काम्रेड नत्थू पाटील किन्हेकार यांच्या छत्रछायेत माजी आमदार नेताजी राजगडकर, संपादक पांडुरंग कोल्हे, सारखे अनेक युवक उत्तुंगाच्या शिखरावर पोहोचले. तेव्हापासूनच येथील सामाजिक सांस्कृतिक चळवळीला दिशा देण्याला आरंभ झाला.
इंग्रजी , मराठी साहित्यावर प्रभुत्व असणारे प्रा.चिंतामण ताकसांडे यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक चळवळीला दिशा देण्याचे भरीव कार्य येथे झाले. बिना दुपारे, शैलेश पांडे, सुनील भेले, सदानंद उईके,दीपक जुनेजा , किशोर पाटील , कैलास आसुटकर, उदय रायपूरे,गजानन कडुकर , मिलिंद डोहणे , महेंद्र वानखेडे , शाहबुद्दिन अजानी, प्रमोद भोयर आदींसहित अनेक युवकांनी मारेगाव ला एक नवीन सांस्कृतिक चळवळ दिली.
कालांतराने लग्न, नौकरी यामुळे हे सर्व बाहेर गेले.तब्बल ४० वर्षानंतर या मैत्री कट्ट्याला पुन्हा बहर आलाय.गत तीन वर्षांपासून त्यांनी मोठ्या ताकदीने ही सांस्कृतिक वैभवाची चळवळ पुन्हा सुरू केली.
पण सध्या मारेगावात एक नवीन तमाशा अनुभवायला मिळत आहे. अचानक एक बोथट स्वयंघोषित महापुरुष मारेगावात अवतरला आहे. दिडीच्या भावाने व्याजाने सावकारी करून येथील कष्टकरी, गरजू,गरीबाची कातडी सोलून जनतेच्या हिताचे सोंग उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपले सावकारी पाप लपवून राजकीय खेळी करायची आणि मी सुप्रसिद्ध समाजसेवक आहे अशी स्वयं घोषणा करून घ्यायची.
हा तमाशा मारेगावकर आता अनुभवत आहे. या सावकारीतून अनेक सुज्ञ युवक बरबादी च्या उंबरठ्यावर उभे झाले. आपले दुकाने बंद करून नाईलाजाने या महान समाजसेवकच्या मागे पडले. शहरात बेरोजगार युवकांना दारू,मटण देऊन, त्यांची दोन चारशे ची गरज भागवून आपल्या मागे – मागे फिरवून शक्तिप्रदर्शन करायचे व समाज सेवाचा नौटंकी खेळ दाखवून सावकारीत गरिबांची कातडी सोलायची हा फंडा वापरला जात आहे. यात गावाशी कवडीचेही देणंघेणं नाही.
काल गावात मोठा तमाशा शहरवासीयांना बघायला मिळाला. एकीकडे महिला दिनानिमित्त आयोजित महिलांची सांस्कृतिक देखावा रॅली जात असताना दुसरीकडे चळवळीशी काहीच घेणंदेणं नसलेला हुल्लडबाजी तमाशा सुरू होता. इकडे सांस्कृतिक चळवळ तर तिकडे स्वयंघोषित वळवळ सुरू होती. कुठलीही वैचारिक प्रगल्भता नसणाऱ्या पन्नास युवकाचा जथ्यांचे सोंग घेऊन फिरणाऱ्यास गुदगुल्या होत होत्या. मात्र हुल्लडबाज गर्दीतून महिला निघतांना अडचण जात होती.
त्या महाभागास भरदिवसा म्हणे आमदारकीचे स्वप्न पडत असल्याची चर्चा आहे.
भरमसाठ व्याजाने शेतकऱ्यांचे रक्त प्यायचे, शेतजमिनी बळकावयाच्या आणि समाजसेवेचे डमरू वाजवून बहिरुप्याच्या वेशात मारेगावभर फिरून नवनवे सोंग उभारायचे. बॅनर वर स्वतःचेच राज्यअभिषेक उरकून घ्यायचे या तमाशाने मारेगाववासी उबूनच नाही तर विटून गेले आहे. सामाजिक सांस्कृतिक पणाचं भान असलेल्यानां हे सोंग पचणी पडलं नाही.केवळ बोभाटा करून कोणतीही चळवळ चालविता येत नसल्याचा प्रत्यय अनेकांना आलाय.
कवडीचं सामाजिक भान नसलेल्याना आता चिंतनाची नितांत गरज बनली असली तरी मारेगावात कालचा गोंधळ बरा होता काय ? यावर चिंतनाची वेळ आलीय.एवढे मात्र खरे.