Breaking News

मारेगाव तालुक्यात मध्यरात्री मोठी कारवाई.. मुजोर दोन वाळू तस्करांच्या आवळल्या मुसक्या

◆ तीन ट्रॅक्टर जप्त : दबा धरून बसलेल्या महसूल पथकाने केली धडक कारवाई
◆ गोरखधंद्याच्या अजेंड्यावर असलेल्या तस्करांचे धाबे दणाणले

दीपक डोहणे : मारेगाव

मारेगाव तालुक्यातील नदी – नाले सपाट करणाऱ्या वाळू तस्करांवर रात्रभर पाळत ठेवून महसूल पथकाने वाळू भरलेल्या तीन ट्रॅक्टरवर गुरुवारी मध्यरात्री एक वाजता जप्तीची कारवाई केल्याने कोसारा,चिंचमंडळ , शिवणी (धोबे) वाळू माफियात धडकी बसली आहे.
मारेगाव तालुक्यातील सीमेवर असलेल्या वर्धा नदी व नाल्याची वाळू राजरोसपणे उपसा करीत तस्करीचे जाळे विणल्या जात असल्याचा गोरखधंदा नविन नाही.राजकीय पक्षांचा पदाधिकारी व्हायचे आणि गोरखधंदे करीत शासनाच्या महसुलला चुना लावायचा अशी काहीशी ओळख झालेल्या तस्करांनी प्रशासना सोबत दोन हात करायचे व आपले इप्सित दिवसरात्र साध्य करायचे असे चिंचमंडळ ,कोसारा,शिवणी धोबे शिवारातील तस्करी कमालीची फोफावली. थेट घाटावर जाणाऱ्या रस्त्यावर महसूल विभागाने खड्डे करून चाप बसविला असतांना या तस्करांनी वेगळी वाट शोधत जेसीबी मशीनच्या सहाय्याने वेगळा रस्ता काढीत अवैध वाळू उपसा कायम सुरू ठेवला.यासाठी सांजातील तलाठी यांनी आपले हात ओले करीत तस्करांना मुकसंमती दिल्याची खमंग चर्चा आहे.
परिणामी , तहसीलदार दीपक पुंडे यांनी व्यव्हरचना आखीत सांजातील तलाठ्यांना वगळून इतरत्र तलाठ्यांना सोबत मंडळ अधिकारी ए. वाय. घुगाने यांच्या नेतृत्वात पथक कार्यान्वित करीत तलाठी सनदेवल कुडमथे , विकास मडावी ,विवेश सोयाम यांनी बुधवारच्या रात्रीपासून दापोरा शिवारात दबा धरून बसले. अवैधरित्या वाळू आणणाऱ्या कोसारा येथील सचिन पचारे यांच्या दोन व चिंचमंडळ येथील अतुल पचारे यांची एक अशा तीन ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करीत पारदर्शकतेचा परिचय दिला.
यावेळी तब्बल सात ट्रॅक्टर रफादफा होण्यात यशस्वी झाले असले तरी या धडक कारवाईने मारेगाव तालुक्यातील वाळू माफियात प्रचंड खळबळ उडून धाबे दणाणले आहे.

सांजाचे तलाठी वगळता कारवाई
मारेगाव तालुक्यातील वाळू माफियांचा वाढता आलेख शासनाचा महसूल बुडविण्यात पुरेसा ठरत आहे.कोसारा ,चिंचमंडळ , आपटी , शिवणी , दांडगाव , कोथुर्ला येथील वाळू माफियांनी कमालीचे डोके वर काढले आहे.मात्र येथील तलाठ्यांची एकही कारवाई नसल्याने त्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकत आहे.या बहुचर्चित तालाठ्यांची वेगवेगळी चर्चा चौफेर होत असतांना तहसीलदार पुंडे यांनी पथकात बदल करीत गोपनीय पध्दतीने वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात कारवाईचे फत्ते यशस्वी केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment