◆ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात बैलबंडीने पाणी आणण्याची नामुष्की
◆ पर्यायी उपाययोजनेवर स्थानिक प्रशासनाचा जावईशोध
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथे भीषण पाणी टंचाईच्या खाईत येथील नागरिक अनाहूतपणे असह्य वेदनेने विव्हळत आहे.कायमस्वरूपी पाणी टंचाईचा विषय मार्गी लावण्यासाठी नागरिकांनी लोकवर्गणी करीत उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र प्रशासनास हे प्रकरण खारीज करण्यात यश आले असले तरी पाणी टंचाईने येथील जनता होरपळून निघत असल्याचे भीषण वास्तव प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे.
मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ हे तीन हजार लोकवस्तीचे गाव.मागील अनेक वर्षांपासून शासनाच्या योजना येथे आवसून उभ्या आहे.यातील मूलभूत गरज असलेला पाणी प्रश्न सातत्याने पेटतो आहे.किंबहुना येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा नशिबी चिकटलेल्या आहेत.
पाणी समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी प्रशासनाने सन २०१६ साली ५४ लाख रुपयांची योजना कार्यान्वित केली.जनतेचा विरोध असतांना प्रशासनाने बळजबरीने वर्धा नदीच्या कडेला विहिरीचे केवळ १५ फुटाचे खोदकाम केले होते.येथूनच जलवाहिनी गावापर्यंत पोहचविण्याचा उद्देश विहिरीत गाळ साचल्याने अधांतरी राहीला.आणि ग्रामस्थांना पाण्याचे चटके बसत असतांना पाण्याची कायम उपाययोजना करिता येथील जनतेनी उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र प्रशासनाच्या बेताल भूमिकेने हे प्रकरण न्यायालयाने खारीज करीत पाण्याची उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनास निर्गमित केले.
परिणामी पंधराव्या वित्त आयोगातून सार्वजनिक नळयोजना व फिल्टर प्लॅन कार्यान्वित करण्याकरिता गावात बोर मारीत ५ इंच ची मोटार टाकण्यात आली.दोन दिवस पाणी पुरवठा झाला आणि पाणी पुरवठा आता बंद पडला.नेमके प्रशासनाचे वाभाडे निघत असतांना आता दीड इंच मोटार टाकण्याचा जावई शोध लावण्यात येत आहे.बेजबाबदारपणाचे कार्य करीत जनतेचा पैसा जनतेला न भेटणाऱ्या पाण्यात जात असून प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका येथील जनतेला बसत आहे.ऐन हिवाळ्यात भीषण पाण्याची टंचाई ने जनता प्रभावित झाली असून गावात केवळ दोन हातपंपा वर तहान भागवित आहे.तर बैलबंडीने मूलभूत गरज भागविण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतवर्षात नामुष्की प्रशासनाने येथील नागरिकांवर आणून ठेवली आहे.हे येथील नागरिकांचे दुर्देव.
दरम्यान , ग्राम पातळीवर पाणी समस्या निकालात काढण्यात सातत्याने माजी उपसरपंच दिवाकर सातपुते , ग्रामपंचायत सदस्य नामदेव नान्हे , भाग्यश्री सातपुते हे आंदोलन , उपोषण , तक्रारी , न्यायालय ,निवेदनाच्या माध्यमातून संघर्ष करीत आहे.मात्र प्रशासन मूग गिळून असल्याने आता पुन्हा पाणी प्रश्न पेटण्याचे संकेत आहे.