संपादकीय….
वाचक हो,
सप्रेम नमस्कार…
आज संविधान दिन.या दिवसाला आपल्या सेवेत दाखल होत आहे ई- पेपर ‘विदर्भ टाईम्स’
लोकशाहीच्या चौकटीला धक्का न बसता भारतीय नागरिकांचे अधिकार अबाधित रहावे म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेवून भारतीय संविधान लिहिले.त्यामुळेच आज भारतीय लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही पैकी एक मानली जाते. मात्र सध्या अनेक राजकीय पक्ष वैचारिक व सामाजिक नागरिकांच्या संघटना कळव्या होत चालल्या आहेत.हे चित्र लोकशाहीसाठी पोषक नाहीच.कोणताही देश विकास साधत असेल तर त्या देशातील धर्मभेद , जातीभेद बाजूला ठेवून खांद्याला खांदा लावून एक दिलाने पुढे जायचे असते.अशा वेळेस वर्तमान परिस्थितीत संविधान आणि त्यावर नितांत श्रद्धा ठेवणारे लोकशाहीची मुस्कटदाबी होवू नये म्हणून अधिक जागृत राहणे अनिवार्य आहे. या जागृतीच्या जाणीवेतून आम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारिता करतोय.तीही अधिक चौकस अन डोळसपणे. एखादा साहेब मटण चारत असेल तर तर त्याच्या विरोधात तो चुकत असला तरी बातमी छापायची नाही असा माहोल सद्या मारेगावात नागरिकांना दिसतो आहे.मोठा भ्रष्टाचार असेल तरी केवळ पाच हजाराची जाहिरात मध्ये सर्व काही ठीक होवून जाते.यामुळेच नागरिकांचा विश्वास आता पत्रकारांवर राहिला नाही.संध्याकाळी पत्रकार टेबलावर मेजवानी घेतांना हमखास दिसले तर नागरिक सर्वकाही समजून जातात.मात्र या काळोखात आम्ही पत्रकारितेचा खरा दीपस्तंभ तेवत ठेवत आहो.नागरिकांनी हे अनुभवले देखील आहे. प्रशासनातील अनेक ना – लायक कर्तव्यशून्य अधिकाऱ्यांवर आम्ही सडकून लिहिले आहे.राजकीय नेत्यांच्या फोल ठरणाऱ्या आश्वासनावरही आम्ही बातम्यांची खैरात केली.हीच परखड व नागरिकांना खऱ्या अर्थाने न्याय देणारी भूमिका घेऊन आम्ही नव्या दमाने व जोमाने आज संविधान दिनी आपल्या सेवेत विटा अर्थात ” विदर्भ टाईम्स ” रुपात दाखल होतोय.नेहमीचा स्नेह कायम असू द्या ..!