
– स्थानिक नेतृत्वाच्या गटबाजीने पदाधिकारी वैतागल्याची भावना
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव तालुका काँग्रेसला अलीकडच्या अवघ्या दिवसात मोठा जोर का झटका बसणार आहे. तालुक्यातील अनेक आजी – माजी पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी व शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती “विदर्भ टाईम्स” ला प्राप्त झाल्याने राजकीय खळबळ उडणार आहे.
काँग्रेस पक्ष हा मारेगाव तालुक्यात एकेकाळी प्रत्येक गावातील कोपऱ्यात पोहचलेला पक्ष. इंदिराबाईचा पक्ष म्हणून झाडून कार्यकर्त्यांची फौज उभी राहायची.नानाविध शासकीय योजनेसह स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत सह सहकार क्षेत्रावर कमालीची पकड सर्वश्रुत आहे. मात्र अलीकडच्या काळाच्या ओघात नानाविध राजकीय पक्षाने पाय रोवत परिवर्तनाची नांदी केली. आणि प्रत्येक गावात राजकीय बदल घडू लागला.
तळागाळातील पक्ष म्हणून ख्याती असलेल्या पक्षाने अनेकांना मोठ्या पदावरही बसविले मात्र काळाच्या ओघात स्वाभिमान सोडून उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्यांची संख्या दिवसांगणिक वाढत असतांना गटबाजीचे ग्रहण म्हणत अनेक मारेगाव तालुका काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते भाजप व शिंदे गटात उडी मारणार असल्याने काँग्रेसला तालुक्यात मोठे खिंडार पडण्याचे संकेत आहे.
जवळपास 50 ते 60 पदाधिकारी /कार्यकर्त्यांची प्रवेश सोहळ्याला रिघ लागली असून येत्या चार दिवसात मंत्री महोदयांच्या उपस्थितीत प्रवेशाचा मुहूर्त होण्याची दाट शक्यता आहे.
गटातटात विखूरलेल्या पक्षात प्रस्थापित व निष्ठावान कार्यकर्त्यांची होणारी घुमसट पक्ष परिवर्तनाची कास धरण्यावर आली असतांना तूर्तास काँग्रेसला चिंतन व्यतिरिक्त वेगळा पर्याय दिसत नसल्याचे अनेक राजकीय जानकारांकडून बोलले जात आहे.