Breaking News

अतिवृष्टीच्या संकटाने ग्रस्त शेतकरीपुत्राची आत्महत्या

 

विदर्भ टाईम्स न्यूज नेटवर्क

कुंभा : मारेगाव तालुक्यातील खैरगाव बुट्टी येथे शेतकरीपुत्राने आर्थिक विवंचनेतून केलेल्या आत्महत्येची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. गुणवंत अजाब कुंमरे (वय 43) असे मृत शेतकरीपुत्राचे नाव असून, काल (6 नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास त्याने विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुणवंत कुंमरे यांचे कुटुंब एकत्रितपणे सुमारे चार हेक्टर शेतीवर उदरनिर्वाह करत होते. मात्र यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कर्जबाजारीपणा आणि पिकांची झालेली हानी यामुळे तो तीव्र मानसिक तणावात होता. या विवंचनेतूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.

घटनेच्या सायंकाळी तो शेताकडे जात असताना रस्त्यावर बेशुद्धावस्थेत आढळला. तातडीने त्याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु वैद्यकिय तपासणीत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून शेतकरी वर्गातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. मृताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment