–वणी मारेगावच्या कलावंतांचे अफलातून सादरीकरण
-नाट्यगृह हाऊसफुल्ल…!
मारेगाव विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव वणी येथील कलावंतांनी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत धमाल केली.” अस्सा नवरा नको ग बाई ” हा नाट्य प्रयोग चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात सादर झाला. या नाटकास रसिक प्रेक्षकांची तोबा गर्दी झाली. जागा नाही मिळाल्याने पायऱ्यावर, दरवाज्या जवळ गर्दी करून नाटक बघू लागले. गर्दीने आयोजकांची तारांबळ उडाली. नाईलाजास्तव गर्दी आवरण्यासाठी मुख्य प्रवेश द्वारावरच कुलूप लावण्यात आले. अनेक प्रेक्षक परत गेले.चंद्रपूर च्या इतिहासात हे पहिल्यांदा घडले.
एकेकाळी वणी उपविभागात मोठी नाट्य परंपरा होती. वणी येथे अनेक दिग्गज कलावंत होते. लो. टिळक महाविद्यालय हे पूर्वी नाट्यगृह होते. मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील संजीवनी नाट्य कला मंदीर चे नाटक संपूर्ण विदर्भात गाजत असे. टीव्ही मोबाईल ने नाटक कमी होत गेली.मात्र आता नाटकांना पुन्हा चांगले वैभव प्राप्त होत आहे. वणी मारेगावच्या कलावंतांनी राज्य शासनाच्या स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला. महिनाभर अथक परिश्रम घेतले. आणि तुडुंब भरलेले नाट्यगृह तीन तास पोट धरून हसू लागले. प्रेक्षकांनी हे नाटक अक्षरशः डोक्यावर घेतले.
अंजना उत्तम बहुउद्देशीय संस्था चिखलगाव वणी तर्फे हा नाट्य प्रयोग सादर करण्यात आला. या नाटकाचे लेखक सदानंद बोरकर आहे. दिग्दर्शन ऍड. मेहमूद पठाण यांनी केले तर निर्मिती प्राचार्य हेमंत चौधरी यांची आहे.
यात प्रमुख भूमिकेत रमाकांत लखमापूरे, प्राचार्य हेमंत चौधरी, गुलशेर पठाण, आयेशा खान, वैशाली वातीले, अँड. मेहमूद पठाण, प्रणाली घूंगरुळ, अनिल सोनवाने, समाधान भगत, वैभव चौधरी, मोरेश्वर कनकूंटवार, सागर मडावी, महेंद्र पुरी आणि महेंद्र नक्षिने यांनी सर्वोत्तम भूमिका केल्या.संगीत जफर खान ,नेपथ्य सानिया खान यांनी तर प्रकाश योजना दिवाकर बोरकर यांनी सांभाळली.रंगभूषा अँड. रूनाली गाणार यांनी तर वेशभूषा प्रणिता चौधरी, राणी लखमापूरे यांनी केले. रंगमंच सहाय्य सिद्धू गाणार यांनी केले.