– विद्यार्थ्यांचा भविष्यातील अनर्थ टाळा
– माजी सभापती अरुणाताई खंडाळकर यांच्या नेतृत्वात पालकांचे निवेदन व आंदोलनाचा ईशारा
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मार्डी परिसरात बहुतांश गावातील विद्यार्थ्यांना तालुका स्थळावर शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी मूलभूत सोय उपलब्ध नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत विद्यार्थ्यांचे नाहक बळी जात असल्याने याची गंभीरपणे दखल घेवून नियमित बस सेवा सुरू करावी किंबहुना भविष्यातील अनर्थ टाळावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा गर्भित ईशारा व आर्जव मागणी माजी सभापती अरुणाताई खंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी तथा पालकांनी वणी आगार प्रमुख यांना निवेदनातून केली आहे.
तालुक्यातील मार्डी परिसरातील विद्यार्थी मारेगाव येथे शिकवणी सह शैक्षणिक धडे गिरविण्यासाठी नियमित येत असतात.मात्र सकाळी व सायंकाळी महामंडळाच्या मुलभूत सोयीची उपलब्धता नसल्याने नाईलाजाने अनेक विद्यार्थी खासगी वाहनाने प्रवास करतात.
किंबहुना हे खासगी वाहन विद्यार्थ्यांसह प्रवाश्यांना कोंबून भरधाव वेगाने धावतात हे वास्तव असतांना चार दिवसांपूर्वी अँटोरिक्षाचा अपघात होवून एका विद्यार्थ्यांचा नाहक दुर्देवी बळी ठरला तर काही विद्यार्थी जखमी झाले होते.
परिणामी , खासगी वाहनांच्या स्पर्धेत अनेक वाहनांचे तांत्रिकदृष्ट्या अडचणी असतांना यावर अंकुश लावण्यात संबंधित प्रशासन सपशेल अपयशी ठरते आहे.यातूनच अपघाताचे प्रमाण विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतत आहे.याची गांभीर्याने दखल घेवून महामंडळांनी विद्यार्थ्यांना सोयी उपलब्ध करून मारेगाव मार्डी शैक्षणिक वेळेत नियमित बस सेवा सुरू करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा ईशारा आगार प्रमुख , वणी यांचेसह जिल्हाधिकारी यांना निवेदनातून देण्यात आला.या प्रसंगी माजी सभापती अरुणताई खंडाळकर , बाजार समितीचे वसंतराव आसुटकर , रविंद्र धानोरकर ,गंगाधर ठावरी , माणिकराव पांगुळ , मोहन जोगी , सुनील सोमटकर , भाऊराव मेश्राम , पुंडलिक रोगे , किशोर पिंगे , राजू शास्त्रकार यांचेसह पालक वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.