– तीन विद्यार्थिनी जखमी
– पिसगाव पांढरकवडा फाट्यानजीकची घटना
– नातेवाईकांचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो अन आक्रोश
मारेगाव : दीपक डोहणे
मार्डी येथून विद्यार्थी घेवून येणाऱ्या अँटोरिक्षाला पांढरकवडा (लहान) येथून येत असलेल्या अँटोरिक्षाने जबर धडक देत अँटोरिक्षा पलटी झाल्याने झालेल्या अपघातात मारेगाव येथे शिक्षण घेणारा दहावीचा विद्यार्थी गतप्राण झाला तर तीन विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारला सकाळी पांढरकवडा फाट्या नजीक घडली.या दुर्देवी घटनेने मृतक विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मन हेलावणारा एकच टाहो फोडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मारेगाव तालुक्यातील केगाव (मार्डी) येथील अनिकेत उर्फ निकेश श्रावण पिंपळशेंडे असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.महेश्री संजय टोंगे (18 ) रा.किन्हाळा , पल्लवी विजय जुमडे (17) मार्डी , दिपीका बालाजी चौघुले (18 ) रा.वडगाव या विद्यार्थिनी अपघातात किरकोळ जखमी झाल्या आहे.
मार्डी येथून विद्यार्थी शिकवणी व शाळा करिता सकाळी अँटोरिक्षाने मारेगाव कडे येत असतांना पांढरकवडा येथून अँटोरिक्षा पिसगाव कडे येत असतांना दोन्ही चालकांना वाहन दिसेनासे झाल्याने भरधाव अँटोरिक्षाने मार्डी वरून येणाऱ्या अँटोरिक्षास जबर धडक दिली.यात अँटोरिक्षा पलटी होत चालकाच्या शेजारी बसलेला अनिकेत खाली कोसळला.त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.मृतक हा मारेगाव येथील राष्ट्रीय विद्यालयात दहावीचा विद्यार्थी होता.
अपघातातील घटनेने नातेवाईकांनी रुग्णालयात मन हेलावणारा टाहो फोडत आक्रोश करीत अश्रूला वाट मोकळी करीत होते.पोटच्या गोळ्याच्या मृत्यूने जबर धक्का बसलेल्या अनिकेतची आई शून्यात बघत असतांना प्रकृती बिघडली.तिच्यावरही येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
रस्त्यामुळे मानव विकास मिशन बसचा वानवा
विद्यार्थ्यांना विहीत वेळेत शाळेत पोहचण्यासाठी ग्रामीण भागात शासनाकडून मानव विकास मिशन अंतर्गत एसटी ची तरतूद आहे.मात्र मार्डी कडे आणि ग्रामीण भागातील रस्त्याची झालेली चाळणीने या बस चा ग्रामिण भागात वानवा आहे.त्यामुळे बहुतांश विद्यार्थी अँटोरिक्षाचा सहारा घेत शिक्षण घेतात किंबहुना अँटोरिक्षात विद्यार्थी , प्रवासी कोंबून भरधाव धावणारे या वाहनाने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेकांच्या अँटोरिक्षाचे कागदपत्रे , परवाना , नंबर प्लेट नसल्याचे वास्तव मात्र पोलिसांच्या डोळ्यात खरच धूळफेक करताहेत काय ? हा प्रश्न येथे संशयास्पद असतांना नियमबाह्य वाहन किती बळी घेणार हे येथे अनुत्तरित आहे. दरम्यान , रस्त्याच्या चाळणीने नव्या रस्त्याचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून धूळखात आहे.मार्डी व ग्रामिण भागातील रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाल्याची माहिती आहे.मात्र कामे सुरू करण्याचा मुहूर्त सदर विभागाला सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पर्यायाने अपघाताची शृंखला कायम असून या रस्त्याने अनेकांचे कंबरडे मोडत आहे.रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सभापती अरुणाताई खंडाळकर यांनी दिला आहे.