– 45 हजाराचा बैल मोजतेय अखेरची घटका
– मारेगाव येथील घटनेने पुन्हा दहशत
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव येथे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत आता मानवासोबत जनावरांना लक्ष करीत आहे.न्यायालय शेजारी बांधून असलेल्या शेतकऱ्याच्या बैलाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने हे पशुधन अखेरची घटका मोजत आहे.यापूर्वी मायलेकीस चावा घेवून महिलेचा मृत्यू , बालकाला ओरबडण्याची घटना व आता पशुधनावर हल्ल्याने प्रशासनाने तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी उजागर होत आहे.
मारेगाव येथील शेतकरी रविंद्र देविदास तेलंग यांचे शेत न्यायालयाचे शेजारी आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली दोन बैलांना दुपारचा विसावा म्हणून बांधलेले होते.अशातच मारेगाव येथे भटक्या कुत्र्यांचा हैदोस असतांना एका बैलास चावा घेतला.काही तासातच सदर जखमी बैलात बिघाड झाला व खाली कोसळून निपचित झाला.
तब्बल 45 हजार रुपये किमतीच्या पशुधनास उपचार करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती भटक्या कुत्र्यांचा हल्ला असल्याचे नमूद केले.तूर्तास ते पशुधन अखेरची घटका मोजत आहे.ऐन हंगामात शेतकऱ्याच्या अकाली नुकसानीने चिंतेचे सावट पसरले आहे.
मारेगाव येथे मानवासह आता भटके कुत्री जनावरांना लक्ष करीत असल्याने मारेगाव करांच्या दहशतीत भर पडत आहे.प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आल्या असल्या तरी आजतागायत कोणीही कंत्राट घेतले नसल्याची माहिती आहे.