
– तब्बल सात मोबाईल हडप : सराईत गुन्हेगार बाजारात सक्रीय
– पोलिस प्रशासना समोर तगडे आव्हान
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव आठवडी बाजारात सराईत मोबाईल चोरटे सक्रीय होत असून तब्बल सात मोबाईलवर चोरट्यांनी हात मारला असतांना एकाच्या मोबाईल फोनपे मधून एक लाख तर दुसऱ्याच्या सात हजार रुपयांवर गंडा घातल्याची घटना घडल्याने व्यापारी तथा नागरिकात भीतीचे सावट निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनासमोर चोरटे पकडण्याचे तगडे आव्हान उभे ठाकले असतांना बाजारात पोलिसांची सक्रीयता वाढविण्याची मागणी होत आहे.
गत मंगळवारला मारेगाव आठवडी बाजारात गोंडबुरांडा येथील उत्तम पुंडलिक गमे या इसमाचा मोबाईल चोरीला गेला.सराईत चोरट्याने मोबाईल लॉक उघडून मोबाईलमध्ये संग्रहित असलेल्या आधारकार्ड च्या आधारे शुक्रवारला सायंकाळी 30,000 / 40,000 / चारवेळा 5000 व शेवटी 10 हजार रुपयावर अवघ्या वेळात गंडा घातला. मोबाईलवर मॅसेज येताच फिर्यादीने कस्टमरकेअरला फोन करून खाते बंद केले. यावेळी फिर्यादीच्या खात्यात अडीच लाख रु. होते मात्र मॅसेजमुळे उर्वरित रक्कम शाबूत राहिली. परिणामी कोलगाव येथील सुनील आस्वले याही इसमाचा मोबाईल चोरून 7 हजार रुपयांवर गंडा घातला. यासोबत सराईत चोरट्यांनी आठवडी बाजारात तब्बल सात मोबाईलवर हात साफ केला.
दरम्याम, मारेगाव आठवडी बाजारात सराईत चोरटे सक्रीय झाल्याने नागरिकांत भितीचे सावट निर्माण झाले असून यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने सक्रीयता दाखविण्याची गरज निकडीची झाली आहे.