
– मारेगावचे सचिन देवाळकर अपघातात ठार
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
यवतमाळ वरून मुळ गाव असलेल्या मारेगाव येथे आईची धावती भेट घेत चंद्रपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या मुलावर अवघ्या 7 मिनिटात काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मारेगावचा सुपुत्र सचिन जगन देवाळकर (37) हा कुटुंबासमवेत चंद्रपूर येथे स्थिरावला. चंद्रपूर येथे खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असतांना मंगळवारला कामानिमित्त यवतमाळला गेला होता. रात्री 9.20 च्या दरम्यान परतीच्या प्रवासात मारेगाव ला आईला भेटून स्वतःच्या अल्टो कारने चंद्रपूर कडे मार्गस्थ होतांना निंबाळा वृंद्राक्ष गार्डन समोर एका ट्रकला ओव्हरटेक करतांना समोरून येणाऱ्या पिकअप वाहन व अल्टो कारच्या जबर धडकेत सचिन याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताने एकुलता एक मुलगा विधवा आईला पोरका करून गेल्याच्या वेदनेने सर्वच विव्हळत आहे तर मारेगावचा उमदा तरुण काळाच्या पडद्याआड गेल्याची खंत सर्वांच्या मनात कोरली गेली.
परिणामी, सचिन याच्या पश्चात आई, पत्नी शुभांगी, कृष्णा व तन्नू असे दोन कोवळी मुलं व विवाहित बहीण आहे.आज बुधवार ला सकाळी 11 वाजता मारेगाव स्थित सचिन यास अखेरचा निरोप (अंत्यसंस्कार ) देण्यात येणार आहे.