– वाळू तस्करांनी ट्रॅक्टर अंगावर चढविले
– मारेगाव तालुक्यातील कोसारा वाळू घाटातील मध्यरात्रीची घटना
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव तालुक्यातील कोसारा घाटात वाळूची तस्करी करणारे ट्रॅक्टर थेट पोलीस पाटील व कोतवाल यांचे अंगावर चढविल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. या जीवघेण्या घटनेने प्रशासनात पुरती खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारला पहाटेच्या सुमारास घडली.
मारेगाव तालुक्यातील वाळू घाटाचा लिलाव नसल्याने वाळू तस्करीत कमालीची वाढ होत असतांना तस्करांवर करडी नजर ठेवून कारवाई करण्याच्या मनसूब्याने येथील पोलीस पाटील प्रेमदास गाणार व कोतवाल दिलीप पचारे हे दुचाकीने घाटावर गेले. घाटावर एक अनोळखी ट्रॅक्टर वाळू भरणा करीत असतांना चालकाने थेट पोलीस पाटील व कोतवाल यांचे अंगावर ट्रॅक्टर चढविला. यात दोघेही गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचाही चुराडा झाला आहे.जखमीवर वणी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
वाळू माफियांनी तस्करीसाठी चांगलेच डोके वर काढले असतांना आता प्रशासकीय दुव्यांना जिवघेण्या प्रसंगाला सामोरं जावे लागत असल्याने प्रशासनासमोर तगडे आव्हान उभे ठाकले आहे.
परिणामी, प्राणघातक हल्ल्याची वृत्त लिहीपर्यंत पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती. मात्र, मारेगाव तालुक्यातील पोलीस पाटील व कोतवाल संघटना आक्रमक होत निवेदन देण्याच्या हालचाली सुरु होत्या.