–तालुका अध्यक्ष सुधाकर मेश्राम
विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव : आदिवासी समाजातील प्रश्नांना संघटितपणे आवाज देण्यासाठी कार्यरत असलेल्या आदिवासी जनसंग्राम संघटनेच्या मारेगाव तालुक्यातील नवी पदनिर्वाचने नुकतीच पार पडली. या बैठकीत तालुका अध्यक्षपदी सुधाकर मेश्राम यांची तर तालुका कार्याध्यक्षपदी शेषराज मडावी यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच सचिन मेश्राम यांची तालुका महासचिव म्हणून निवड होऊन त्यांना औपचारिक नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
ही निवड प्रक्रिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चरणदास मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना आदिवासी समाजाच्या विकासासाठी तळागाळापर्यंत संघटन पोहोचवण्याची आवश्यकता अधोरेखित केली. खेडे, तांडा, वाडी-वस्त्यांपर्यंत संघटनेची शाखा स्थापन करून आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देणे हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
“आदिवासी समाजावर होणारे अन्याय संघटित चळवळीमुळेच दूर होऊ शकतात. समाजातील सर्वसामान्य घटकांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे,” असे चरणदास मेश्राम यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात आदिवासी जनसंग्राम संघटनेच्या महाराष्ट्र महिला महासचिव सुषमा आर. किलनाक यांनीही मनोगत व्यक्त केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तळागाळातील आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी नव्या उमेद, नवी ऊर्जा आणि दृढ निश्चयाने हे पदाधिकारी काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.