– जन्मजात दोन्ही डोळ्यांनी अंध
– नाशिकमध्ये लागली नोकरी
मारेगाव : दीपक डोहणे
वडील अल्पभूधारक शेतकरी. आई रोजमजुरी करून जगण्याचा घराला आकार देत होती. अशातच त्यांच्या संसारवेलीवर थोरला मुलगा जन्माला आला.मात्र, तो दोन्ही डोळ्यांनी अंध. त्याला जग पाहता येत नव्हते. हतबल झालेल्या आईवडिलांनी या भयावह परिस्थितीचा सामना करीत मुलाला घडविले. शिक्षणात कमालीचा डोळसपणा दाखवित मुलगाही शिक्षणाचे धडे गिरवू लागला. शिक्षणासाठी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने अकोला, वरोरा, नागपूर प्रवास करीत त्याने ज्ञानाची ज्योत पेटविली आणि तो नाशिकला नोकरीवर लागला.कुटुंबाचा आर्थिक आधारवड देखील बनला.
ही यशोगाथा आहे यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुका मध्ये असलेल्या मार्डी येथील पवन मोरेश्वर आखाडे याची.
पवन या अंध विद्यार्थ्याने अंधत्वावर मात करीत बालवयापासून उच्च शिक्षण घेण्याची धडपड सुरु केली. अंधाना ब्रेल लिपीत शिक्षणाची सोय असल्याने त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेत बारावी चे शिक्षण वरोरा येथील संध्या निकेतन अपंगाची कर्मशाळा येथून 83 टक्के गुण घेत पूर्ण केले. थेट हॉंगकॉंग येथून शिक्षणाचे जाळे विनलेल्या नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून पदवीधर शिक्षण घेतले . त्याला हेल्प फाउंडेशनने शिष्यवृत्ती प्रदान केली. त्याच्या गुड परफॉर्मन्स ची दखल घेत थेट बंगलोर येथे TCC व EMET स्किल डेवलपमेंट इंटरशिप साठी निवड केली. नाशिक येथील ब्लाईंड फाउंडेशन ऑर्गनाईज़ेशन संस्थेत पवन हा ट्रेनर म्हणून नोकरीला लागला. आता तो चक्क पदवीधर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे. त्याने आपल्या ज्ञानाची ज्योत अखंड पेटवीली. अंध असल्याचे रडगाणे गाण्यापेक्षा त्याने त्यालाच जीवनगाणे शिकविले. आता तो संपूर्ण तालुक्यात गौरवास आणि कौतुकास पात्र ठरत आहे.
अलीकडच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सर्व सोय उपलब्ध असतांना, तरुणाई मात्र सैरभैर झालेली आहे. अनेकजण बहुदा घरची हलाखीची परिस्थितीने शिक्षण अर्ध्यावर सोडून घराच्या चार भिंतीत जीवन कंठीत असतात. मात्र, यात पवन हा अपवाद ठरला. पवन या अंध विद्यार्थ्याने आत्मविश्वाच्या बळावर आणि बिकट परिस्थितीवर मात करून आयुष्याचे चीज केल्याचे अधोरेखित झाले. त्याच्या कठोर मेहनतीच्या कर्तुत्वाला ‘विदर्भ टाईम्स’ समूह तथा वाचकाकडून सॅल्यूट.