– बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनाने आंदोलन मागे
– वाहनाच्या दुतर्फा रांगा
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
प्रशासनाच्या बेताल भूमिकेचा परिपाक म्हणून मारेगाव मार्डी रस्त्याने खड्ड्याचे साम्राज्य दुचाकीस्वारांचे बळी घेत असतांना या रस्त्यांची किमान डागडुजी करण्याची मागणी घेवून काँग्रेसच्या वतीने थेट खड्ड्यातील पाण्यात बसून अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. अधिकारी आल्यागत मुरूम येत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलनाने दुतर्फा वाहतुकीच्या दोन किमी. पर्यंत रांगा लागल्या होत्या.
मारेगाव मार्डी रस्त्याने वाहने तर सोडाच पायदळ चालणे कठीण झाले आहे. जोगोजागी खड्डे त्यात पाणी भरल्याने वाहन धारकांचा तोल जावून अपघाताची मालिका कायम सुरु असून यात अनेकांचे बळी गेले आहे.
दरम्यान, सदर रस्ता मंजूर होऊनही काम सुरु करण्याचा मुहूर्त प्रशासनास सापडत नसल्याने आंदोलन स्थळी संताप व्यक्त करण्यात येत होता. भालेवाडी नजीक रस्त्यावर खड्ड्यात असलेल्या पाण्यात अर्धनग्न अवस्थेत बसून काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, वसंत जिनिंग संचालक अंकुश माफूर, नगरसेवक आकाश बदकी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. अर्धनग्न आंदोलनासह रास्ता रोको करीत प्रशासना विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मारेगाव – वणी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी सह कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
परिणामी,बांधकाम विभागाचे अधिकारी येताच लाखोळ्या वाहत प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांनी अपघाताला निमंत्रण देणाऱ्या रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी पावसाळा समाप्तीचे सुतोवाच केले. मात्र, आंदोलक आक्रमक झाल्याने तात्काळ खड्ड्यात मुरूम टाकण्याची प्रक्रिया सुरु करून खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रारंभ केला. यानंतरच अर्धनग्न व रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी, पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त, महसूल विभाग अधिकाऱ्यांची उपस्थिती व बांधकाम विभागाने दिलेल्या आश्वासनाने आंदोलनाची सांगता करीत किमान तात्पुरती डागडुजी चे यश काँग्रेस आंदोलनाने यश पदरी पाडून घेतल्याचे समाधान वाहतूक करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. उत्स्फूर्तपणे झालेल्या आंदोलनात आंदोलकाची तोबा गर्दी व वाहतुकीची कोंडी लक्षवेधी होती.