– मारेगाव तालुका काँग्रेसचा पुढाकार
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
गेल्या अनेक वर्षांपासून जनतेचे बळी घेत कंबरडे मोडणाऱ्या मार्डी मारेगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सपशेल डोळेझाक करणाऱ्या प्रशासनाविरोधात आता जनता सरसावली असून मारेगाव तालुका काँग्रेस च्या वतीने तात्काळ रस्ता दुरुस्तीसाठी उद्या दि. 28 जुलै रोजी मारेगाव भालेवाडी रस्त्याच्या मधोमध खड्डे पडलेल्या स्थळी साचलेल्या गढूळ पाण्यात अर्धनग्न आंदोलन करीत, रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मारेगाव मार्डी रस्त्याची दयनीय अवस्था आहे.पावलावर असलेल्या खंड्याने आजतागायत अनेकांचे बळी गेले तर अनेकानेक दुचाकीस्वारांना मनक्याच्या आजाराने ग्रासले आहे. हीच अवस्था तालुक्यातील अनेक गावात असतांना प्रशासन मात्र मूग गिळून आहे.
मारेगाव मार्डी रस्त्याचा निधी मागील काही महिन्यापूर्वीच मंजूर झाल्याचा कांगावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र डागडुजी म्हणून थातुरमातुर साईडपट्या मारण्यात आल्या तर खड्डे बुजविण्यासाठी टोकदार चुरीची मलमपट्टी करण्यात आली.यामुळे अनेक वाहनांच्या टायर पंचर प्रमाण वाढले आहे. यारस्त्याने वाहन धारक कमालीचे वैतागले आहे.
सदरील रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्याच्या प्रमुख मागणीसाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या सोमवारला मारेगाव तालुका कोग्रसच्या वतीने मारेगाव भालेवाडी मधोमध गढूळ पाण्याने भरलेल्या खड्ड्यात अर्धनग्न आंदोलन छेडण्यात येणार आहे.
मारेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या अभिनव आंदोलनाची प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे तालुका वासियांचे लक्ष लागले आहे.