– मालमत्ता कराचा भरणा केला नसल्याचा ठपका
– न्यायिक भूमिकेसाठी आयुक्ताकडे धाव
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
तालुक्यातील नवरगाव (धरण ) येथील ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य यांना अपात्र केल्याने राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे.
नवरगाव येथील नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये दोन गटातील “राजकारण” सर्वश्रुत आहे.येथील वार्ड क्रं. 1 व वार्ड क्रमांक 3 मधील अनुक्रमे शशिकांत डवरे (सदस्य) आणि संतोष महाडुळे (उपसरपंच) यांनी त्यांच्या मालमत्ता कराचे देयके प्राप्त होऊनही विहित मुदतीत भरणा केला नसल्याची येथील नामदेव मेश्राम यांनी अप्पर जिल्हाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
संबंधित सचिव यांचा लेखी जबाब व युक्तिवाद अंती महाडुळे व डवरे यांना महाराष्ट्र अधीनियम मधील तरतुदी नुसार अनहर्ता प्राप्त होत असल्याने त्यांना आदेशा दिनांकित पासून पुढील कालावधीकरिता अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा आदेश अग्रेषित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
न्यायिक भूमिकेसाठी आयुक्ताकडे धाव
अप्पर जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आदेशाच्या विरोधात आम्ही आयुक्ताकडे दाद मागण्यासाठी अपील केली असून ग्राम पातळीवरील अंतर्गत राजकारणाला कुरघोडीची झालर आहे. यापूर्वी व वर्तमान स्थितीतील ग्रा.पं.सदस्यांचा थकीत कर असतांना जाणीवपूर्वक बगल देण्यात येवून केवळ कुरघोडी करण्यात आल्याने याविरोधात आम्ही आयुक्ताकडे अपील केली आहे.
संतोष महाडुळे,नवरगाव(धरण)