
नगर पंचायत विरोधात व्यापारी संघटना व सर्वपक्षीय सरसावणार
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
नगर पंचायत प्रशासनाने लागू केलेल्या अवाजवी आणि जाचक कर आकारणीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय , व्यापारी संघटना आणि त्रस्त नागरिकांनी आता आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.बुधवारी झालेल्या सभेत प्रशासनाच्या ‘मनमानी’ कारभाराचा पाढा वाचण्यात आला असून, गांधीगिरीच्या मार्गाने लढा उभारण्याचा पवित्रा घेण्यात आला.
गत काही महिन्यापासून नगर पंचायतीने केलेली नवीन कर आकारणी ही सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या मानगूटीवर बसली आहे. अन्यायाविरुद्ध ठोस भूमिका घेण्यासाठी ‘मारेगाव कर विरोधी कृती समिती’ आणि ‘व्यापारी असोसिएशन’ यांच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेला मारेगावकर व व्यापाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.याप्रसंगी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप खुराणा,सचिव दुष्यंत जैस्वाल, राकेश खुराणा (अध्यक्ष, वणी व्यापारी संघटना) गौरीशंकर खुराणा (अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती),गजानन भाऊ किन्हेकार,युनुस शेख,अनंता मांडवकर,सुभाष मत्ते, प्रविण कुचणकर यांचेसह गणमान्य उपस्थित होते.
या प्रसंगी बैठकीत सर्वानुमते नगर पंचायत प्रशासनाला या कर आकारणीवर फेरविचार करण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात यावी.
प्रशासनाने समाधानकारक तोडगा काढला नाही, तर गांधीजींच्या मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा एल्गार पुकारण्यात आला.
अवाजवी कर आकारण्याच्या विरोधात आता संघटना व जनता सरसावणार असल्याने या आंदोलनाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे.